भीमा कोरेगाव प्रकरण; अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर ;परंतु

मुंबई: शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे स्पष्ट केले होते. याच याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता राव यांना त्यांच्या हैदराबादमधील घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नाही.

वरवरा राव हे सध्या 81 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. यासाठी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना जामीन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, न्यायालाकडून अनेकदा ही विनंती फेटाळण्यात आली होती. अखेर तुरुंगात त्यांच्यावर उपचार शक्य नाहीत हे लक्षात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने त्यांना रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वरवरा राव यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वरवरा राव यांची प्रकृती पाहता त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात होती. वरवरा राव यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.

वरवरा राव यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. वरवरा राव सध्या 81 वर्षांचे असून आजारपणामुळे अंथरुणाला खिळले आहेत. राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात घालवले आहेत. यावरुनच त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात येते. राव यांची प्रकृती ही कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती.

नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.