भूवैकुंठ आता हाकेच्या अंतरावर

– औदुंबर भिसे

वाखरी –
विठ्ठल आमुचे जीवन ।
आगम निगमाचें स्थान ।
विठ्ठल सिद्धीचे साधन ।
विठ्ठल ध्यान विसावा ।।
विठ्ठल आमुचे जीवन आहे. आगम निगमाचे स्थान आहे, सिद्धीचे साधन आहे आणि तोच आमचा विसावा आहे, अशा सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांसह टाळ, मृदंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत भक्तीचे मळे फुलवित आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानदेव, श्री संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव आदि संतांसह राज्यभरातून आलेल्या संतांचे पालखी सोहळे पंढरी समीप वाखरीत दाखल झाले आहेत. आता, पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिले आहे. दरम्यान, संत ज्ञानदेव व संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. गुरूवारी (दि.10) हा भक्तीचा महासागर विठूरायाच्या भूवैकुंठ नगरीत पोहोचेल व चंद्रभागेत विलीन होईल.

भंडीशेगांव मुक्कामी पहाटे माऊलींची विधीवत पूजा करण्यात आली. दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वारकऱ्यांनी दिंड्या दिंड्यामध्ये कांदाभजी करून कांदेनवमी साजरी केली. दुपारचे भोजन घेवून हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. दुपारी 3:00 वाजता हा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. दुपारी 3:15 वाजता अश्‍व धावण्यासाठी सोडण्यात आले. ढगांमध्ये मेघराजाने गर्दी केली आणि अश्‍वांसह मेघराजाही बरसू लागला. पुढे स्वाराचा अश्‍व तर मागे माऊलीचा अश्‍व धावत होता. टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली। माऊली।। नामाचा अखंड जयघोष चालू होता.

अश्‍वांनी धावत जावून माऊलींला एक प्रदक्षणा पूर्ण करीत रथामागे 20 दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येवून माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेवून पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल असा जयघोष वैष्णवांनी केला व उभे रिंगण पूर्ण करण्यात आले.

उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा सायंकाळी 4:00 वाजता रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला. चोपदार व पोलिसांनी रिंगण आखून घेतले. या आखीव रेखीव रिंगणावर गोल रिंगणाला सुरूवात झाली. सुरूवातीला माऊलींचा व स्वाराचा अश्‍व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. त्यानंतर पताकाधारी व माऊलींची पालखी दिंड्यांसमवेत एक प्रदक्षणा पूर्ण करून रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. 5:00 वाजता जरी पटक्‍याचा भोपळे दिंडीचा ध्वज रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आला. त्याने तीन प्रदक्षीणा पूर्ण केल्या. त्यानंतर स्वाराच्या अश्‍वासह माऊलीच्या अश्‍वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदिपक दौड करून अडीच प्रदक्षणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थितीत भाविकांनी माऊली। माऊली।। नामाचा जयघोष केला. गोल रिंगणानंतर दिंड्यादिंड्यामध्ये खेळ रंगले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. समाज आरतीनंतर तो वाखरीत विसावला.

आज पालख्या पंढरीत..
गुरुवारी (दि.10) संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदि संतांच्या पालख्यांना विठुरायाच्या नगरीत नेण्यासाठी संत नामदेव यांची पालखी वाखरीत येईल. त्यानंतर हे सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील. सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. विसावा पादुका येथे पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माऊलींच्या पादुका या शितोळे सरकारांच्या गळ्यात दिल्या जातील व त्या पंढरपूरातील ज्ञानेश्‍वर मंदिरात नेल्या जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.