अन्य ठिकाणचे हॉटस्पॉट वाढले
पुणे – शहरात सर्वप्रथम करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील साथीचा वेग आटोक्यात येत आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या 8 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार येथे सर्वांत कमी म्हणजे केवळ 177 ऍक्टिव्ह (उपचार घेत असलेले) रुग्ण असून, 1017 जण बरे झाले आहेत. तर त्या शेजारीच असलेल्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रुग्णसंख्या मात्र कमी होत नाही. तेथे अद्यापही 762 ऍक्टिव्ह रुग्ण असून, 1,756 जण बरे झाले आहेत.
करोनासंबंधी माहिती महापालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटीमार्फत जाहीर केली जाते. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्र, रुग्ण, बरे झालेले रुग्ण, रुग्णाचे वय आणि इतर माहितीचा समावेश असतो. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आजपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र, ती संख्या आता कमी झाली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये औंध, बाणेर, बालेवाडी, सिंहगड रस्ता भागांत रुग्णांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात केवळ 12 रुग्ण होते. हा भाग ग्रीन झोनमध्ये जाणार असे असताना शिथिलतेनंतर येथे संख्या वाढत गेली. या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 676 रुग्ण उपचार घेत आहेत, तर 796 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या 457 रुग्ण उपचार घेत असून, या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात सर्वाधिक 1 हजार 882 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरात सर्वाधिक 762 ऍक्टिव्ह रुग्ण असून, 1 हजार 756 जण बरे झाले आहेत.