करोना बाधितांची संख्या आता उतरणीकडे
पुणे – शहरात करोनाचा “हॉटस्पॉट’ असलेला भवानी पेठ परिसर करोनाच्या धक्क्यातून आता हळूहळू सावरत आहे. या क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रुग्णसंख्या कमी होत आहे. प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजना, संचारबंदी नियमांना नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या संयमाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
दाट लोकवस्ती असलेल्या भवनीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करोनाने शिरकाव केला. त्यानंतर मागील दोन महिने या हद्दीत दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत होती. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण होते. मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा परिसर करोना रुग्णांच्या संख्येत आघाडीवर होता. दि. 11 एप्रिल रोजी या भागातील रुग्णसंख्या 56 होती. ती 24 एप्रिल-195, 6 मे-451, 10 मे-505, 16 मे – 660, 31 मे-851 वर पोहचला. यातील सुमारे 600 जण बरे झाले आहेत. आता मागील आठ दिवसांपासून या भागात करोना बाधितांची संख्या लक्षणीयरित्या घटत आहे. त्यातही सर्वाधिक बाधित असलेल्या प्रभाग क्रमांक 18 खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ आणि प्रभाग क्रमांक 19 लोहियानगर-कासेवाडीत रुग्णसंख्या कमी होत आहे.
नियमांची कडक अंमलबजावणी
करोना रोखण्यासाठी शासनाने पुण्यात आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. यात साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर हा भाग 10 मेपासून 100 टक्के सील करण्यात आला.