पुणे – पावभाजी, मटार पनीर, मटार उसळ हे पदार्थ चाखण्यासाठी बहुतांश पुणेकरांचे हॉटेल, कॅफे अथवा स्टॉल ठरलेले असतात. पदार्थाची चव टिकून रहावी, या साठी हाॅटेलचालक सुक्या वाटाण्याचा समावेश खाद्यपदार्थांमध्ये करतात. पण, सध्या या सुक्या हिरव्या मटारचा साठा संपत आल्याने वाटाण्याचे भाव कडाडले आहेत.
मागील वर्षी घाऊक बाजारात ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो मिळणारा वाटाणा आता १५० ते १६० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात हे भाव १८० ते २०० रुपये आहेत. “पुढील चार ते पाच महिने मटारचे हे दर कायम राहतील. मटारचा हंगाम सुरू झाल्यानंतर हिरव्या वाटाण्याचे भाव कमी होतील,’ अशी शक्यता मार्केट यार्डातील व्यापारी निशांत चोरडिया यांनी व्यक्त केली.
उत्पादनावर परिणाम
मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश येथे वाटाण्याचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. यामुळे प्रक्रिया उद्योगांकडे वाटाणा कमी प्रमाणात आला. त्यामुळे आता त्याचा तुटवडा भासत आहे.
बाजारातील सद्यस्थिती
या वाटाण्याची सध्या दररोज ३० किलोची २०० पोती बाजारात दाखल होत आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ५०० ते ६०० पोत्यांपर्यंत होते. सध्या आवक निम्म्याहून अधिक घटली आहे. तुलनते मागणी खूप आहे.
सुका हिरवा वाटाणा कडाडण्याची प्रमुख कारणे
– लहरी हवामानामुळे देशांतर्गत उत्पादनात झालेली घट
– केंद्र सरकारने हिरव्या वाटाण्याच्या आयातीस घातलेली बंदी
– ओला मटार नसल्याने सुक्या मटारच्या मागणीत झालेली वाढ
– उच्च दर्जाच्या मटारची बाजारात अनुउपलब्धता
“सध्या देशातील हिरव्या वाटाण्याचा साठा संपत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतून उर्वरित माल विक्रीसाठी येत आहे. डिसेंबरपर्यंत नव्या हंगामातील वाटाणा बाजारात दाखल होईल. तोपर्यंत केंद्र सरकारने आयात सुरू केल्यास दर कमी होतील. अन्यथा घाऊक बाजारात वाटाण्याचे दर २०० रुपये किलोपर्यंत जातील.” – विजय राठोड, सुक्या वाटाण्याचे व्यापारी, मार्केटयार्ड.