आमदार गणपतराव देशमुख यांचे राजकीय वारसदार भाऊसाहेब रुपनर

सांगोला विधानसभेचे शेकापचे उमेदवार

सोलापूर – सलग 11 वेळा दुष्काळी सांगोला विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी अखेर आपला राजकीय वारसदार जाहीर केला. फॅबटेक उद्योग समूहाचे प्रमुख व उद्योजक भाऊसाहेब रुपनर सांगोला विधानसभेचे उमेदवार असतील आणि तेच शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा त्यांनी केली.

वयोमानामुळे विधानसभा निवडणूक लढविणे शक्‍य नाही, शेकापने दुसरा उमेदवार बघावा असे सांगून त्यांनी रविवारी घटस्थापनेदिवशी शेकापचे सरचिटणीस व जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन रुपनर यांच्या नावाची घोषणा केली.

आमदार गणपतरावांच्या अनुपस्थितीत आणि रूपनर यांच्या येण्याने सांगोला विधानसभा निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. आमदार गणपतराव देशमुख असते तर निवडणूक एकतर्फी झाली असती. कारण आमदार गणपतरावांनी 50 वर्षांपासून सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे.

भाऊसाहेब रूपनर हे सांगोला तालुक्‍यातील मेडसिंगी गावचे रहिवासी आहेत. ते उच्चशिक्षित असून त्यांचा फॅबटेक या नावाने मोठा उद्योगसमूह आहे. तर शिक्षणसंस्थासुद्धा कार्यरत आहेत. आमदार गणपतराव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक लढविणार नाहीत, अशी घोषणा केली होती. गणपतरावांच्यानंतर त्यांचे चिरंजीव निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र रविवारी भाऊसाहेब रुपनर यांच्या रूपाने त्यांना राजकीय वारसदार मिळाला.

मागील 50 वर्षाहून अधिक काळ गणपतरावांनी सांगोल्याचे नेतृत्व केले आहे. केवळ दोनवेळा ते पराभूत झाले आहेत. 1972 आणि 1995 सालचा अपवाद वगळता ते तब्बल 11 वेळा सांगोलामधून निवडून आले असून त्यांचा तो विक्रम मानला जात आहे . त्यांनी दोनवेळा मंत्रिमंडळात कामकाज पाहिले आहे. मात्र बहुतांश काळ त्यांनी विरोधी बाकावरच राहणे पसंत केले आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.