भाऊसाहेब पाटील हजर अन्‌ धायगुडे रजेवर

सातारा पालिका
बांधकाम विभागात पाणी मुरत असल्याची चर्चा

सातारा – पंतप्रधान आवास योजनेच्या राजकीय दबावाचा अंक अद्याप न संपल्याने भाऊसाहेब पाटील हजर झाले आणि धायगुडे रजेवर गेले असा प्रकार समोर आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून मुख्याधिकाऱ्यांची कानउघाडणी झाल्याने दोन महिने रखडलेल्या निविदा शंकर गोरे यांच्या “की’ने दोन तासांत काढण्यात आल्या. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रकरणात नक्की काय पाणी मुरतयं, याचा शोध घेणे विरोधकांना क्रमप्राप्त ठरले आहे.

दरम्यान, सोमवारी कामावर हजर झालेल्या भाऊसाहेब पाटलांच्या उपस्थितीची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा होती. मंगळवारी दिवसभर बांधकाम विभागात आढावा बैठका रंगल्याचे वृत्त आहे. बांधकाम विभागावरचे राजकीय दबावाचे नाट्य अद्याप संपले नसल्याने सारेच काही ऑलवेल नसल्याचेही समोर आले आहे.

भाऊसाहेब म्हणजे अर्धा टक्‍क्‍याचे मानकरी असून ठेकेदारांची फाईल त्याशिवाय पुढे जात नाही, असा खळबळनजक दावा सातारा विकास आघाडीच्या दमदार राजकीय पंडिताने केला होता. पाटलांनी आवास योजनेच्या निविदेसाठी त्यांच्या संपर्कातील चाळीसगावची पार्टीसुद्धा मॅनेज केल्याचा खुलासा करण्यात आला. भाऊसाहेब पाटलांनी ऐन लोकसभा निवडणुकांमध्ये दीर्घ रजा टाकून प्रशासनाची अडचण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

आवास योजनेतील बिलो टेंडरिंगचा गुंता वाढवल्याची शिक्षा भाऊसाहेबांना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, राजकीय संदर्भाने टेंडर योजनेचा ठेकेदार मर्जीतला रहावा यासाठी जोरदार खटपट झाली. या प्रकरणाचा दबाव इतका होता अगदी ठेक्‍यावरचे इंजिनिअरसुद्धा राजकीय भीतीपोटी परगावी रवाना झाले होते.

बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तीन महिन्याच्या दीर्घ रजेनंतर सोमवारी हजर झाले. त्यांच्या कुलुपबंद केबिनमध्ये बऱ्याच महिन्यांनी आढावा बैठका पार पडल्या. काही निविदांचे तांत्रिक तपशील त्यांनी तपासल्याचे वृत्त आहे. तसेच मर्जीतले लिपिक बोलावून डायरीतील महत्वाच्या नोंदीचा (आता या नोंदी कशाच्या हे विचारायची सोय नाही) तपशील घेतला.

ही बाब बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. दरम्यान, ज्या निविदा भाऊसाहेब पाटील नसल्यामुळे रखडल्या त्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन तासात मार्गी लावल्या. त्यातही सर्किट हाऊसवर उदयनराजे स्टाईल कान पिळणी झाल्याने मुख्याधिकारी एकदम सतर्क झाले आणि साडेतीन कोटीच्या निविदा काढण्यात आल्या.

भाऊसाहेब हजर झाले मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत बांधकाम विभागात सह्यांचे नामधारी अभियंता धायगुडे अचानक वैद्यकीय रजेवर गेल्याचे कळताच बांधकाम विभाग सारखाच का रजेवर जातोय, हा प्रश्‍न सातारकरांना पडत आहे. याचे सारे मूळ पंतप्रधान आवास योजना आणि त्याअनुषंगाने साताऱ्यात एका हॉटेलवर झालेल्या बैठकीत असल्याचा दावा विरोधक खासगीत करतात. मात्र, हे प्रकरण धसास लावण्यासाठी पुरेशी राजकीय ताकद लावली जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)