शिवसेनेत प्रवेश; कोकणात राष्ट्रवादीला खिंडार
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता कोकणातही मोठे धक्के बसू लागले आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे बडे नेते गणेश नाईक यांच्याबरोबरच आमदार अवधुत तटकरे यांच्यापाठोपाठ गुहागर येथील माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. जाधव यांच्या घरवापसीमुळे कोकणात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
भास्कर जाधव शुक्रवारी सकाळी विशेष विमानाने औरंगाबाद येथे पोहोचले. तेथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर जाधव यांनी दुपारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आदी उपस्थित होते.
मूळचा शिवसैनिक आहे. माझा अंतरात्माच शिवसैनिक असल्यामुळे राष्ट्रवादीत काम करतानाही माझा मूळ स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात प्रेम आहे. त्यामुळे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या घरात शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीत कुणाशीही भांडण नाही, कुणावरही आक्षेप किंवा आरोप नसल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात आपण आपली संपूर्ण भूमिका स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.