मुंबई – सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर सिनेसृष्टीतील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघाले आहे. या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.
अशातच काल प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. या प्रकरणावरुन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता भारती पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने हर्षला अटक केली.
माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरात एनसीबीने ही छापेमारी केली आहे. यावेळी भारती सिंह आणि तिचा पती दोघेही उपस्थित होते. या दोघांवरही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या छापेमारीदरम्यान काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असल्याचे समजत आहे.