चंदिगढ – पंजाब आणि चंदिगढमध्ये शुक्रवारी थंडीची जोरदार लाट आली आहे. हिस्सार भागात उणे 1.2 अंश तापमानाची नोंद झाली. या भागात धूक्याची दाट चादर पसरली होती.त्यामुळे हाताच्या अंतरावरील वस्तू दिसत नव्हत्या. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार नेहमीच्या तापमानापेक्षा खूपच कमी तापमानाची शुक्रवारी नोंद झाली.
हिस्सारमध्ये आजवरच्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. एवढेच नव्हे तर या दोन राज्यातील ते सर्वात थंड शहर ठरले. नेहमीच्या तापमानापेक्षा आठ अंशानी घसरण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
हरियाणातीलच नरनौल येथे तापमानाचा पारा उणे 0.2 अंश नोंदवले गेले. सिरसा (2अंश), अंबाला (4.4अंश), कर्नाल (3.5अंश), रोहतक (2अंश) आणि भीवनी (3.9अंश) येथेही कमालीचा गारठा होता. दोन्ही राज्याची राजधानी असणाऱ्या चंदिगढमध्ये 5.1 अंश तापमानाची नोंद झाली.
पंजाबमध्ये अनेक ठिकाणी थंडीची लाट आली. फरीदकोटमध्ये तापमान 0.2 अंश सेल्सियस नोंदवले गेले. तर भटींडात तापमान 1.2 अंश तर अमृतसरमध्ये 2.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पठाणकोटमध्ये 3.1 अंश, हलवारामध्ये 3.5 अंश, आदमपूरमध्ये 3.1 अंश, पतियाळामध्ये 3.7 अंश तापमान नोंदवले गेले.