इंदापुरचे भार्गवराम उद्यान समस्यांच्या विळख्यात

काटेरी झुडपांचे साम्राज्य : उद्यानातील कोट्यवधीचा खर्च धूळखात
नीलकंठ मोहिते
रेडा – इंदापूर नगरपालिकेने देशात स्वच्छ व सुंदर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नावलौकिक कमविला आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील वस्तुस्थिती विदारक आहे. शहरातील नागरिकांना भार्गवराम उद्यान स्वच्छतेअभावी तसेच कोट्यवधी रुपये खर्चूनही साहित्य अडगळीत गेले आहे. हे उद्यान काटेरी झुडपाच्या विळख्यात सापडले आहे. कारंजे बंद असून अनेक अवैध व्यवसाय करण्याचे केंद्र हे उद्यान बनले आहे. त्यामुळे नगरपालिका याकडे लक्ष देणार का, असा सवाल इंदापूरकर करीत आहेत.

इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून भार्गवराम उद्यानात लाखो रुपये खर्च करून वेगवेगळे वृक्षारोपण केले. शहरातील बालकांसाठी घसरगुंड्या व इतर खेळांचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध केले. उद्यानात बाके निर्माण करण्यात आली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पाण्याच्या कारंजा लोकार्पण केले. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारंज्या बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी महावितरणची विद्युतयंत्रणा तोडली आहे. त्यामुळे नगरपालिकेने काही कालावधीपुरता “शो’ केला. मात्र नागरिकांच्या सुविधेसाठी उद्यानात सुविधा सद्यस्थितीला उपलब्ध नसल्यामुळे खर्च केलेली कोट्यवधीची रक्‍कम पाण्यात गेली आहे.

नगरपालिकेच्या हद्दीतील एकमेव उद्यानात कोठेही स्वच्छता दिसत नाही. अद्ययावत कचराकुंड्या गेटसमोर मांडलेल्या दिसतात. मात्र, मुख्य उद्यानाच्या गेटवर स्वच्छतेचे फलक ठळक अक्षरांनी रेखाटलेले आहेत. उद्यानात काटेरी झुडपाने उद्यानाला वेढा घातला आहे. शहराची लोकसंख्या वाढत आहे. या शहराला बाजारपेठ एकच आहे. मात्र, शहरवासीयांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालयाचा परिसर सोडता कोठेही बाग बगीचा नाही. अनेक वर्षांपासून उद्यानाच्या नावाखाली निधी आणण्याचे व निधी कागदोपत्री खर्च देण्याचे सत्र सुरू असल्याची चर्चा आहे. उद्यानात पत्त्याची पाने कुटणे, मद्यप्राशन, अनैतिक चाळे दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी अपेक्षा इंदापूर शहरवासीयांनी केली आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या प्रशासनाने स्वच्छतेमध्ये देश पातळीवर क्रमांक मिळवला आहे. मात्र, इतर सुविधांबरोबर उद्यानाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नको ते प्रकार याठिकाणी दिसत आहेत. सर्व सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
– अनिकेत वाघ, नगरसेवक.

भार्गवराम उद्यानात स्वच्छता कागदोपत्री दिसतो आहे. मात्र, ही स्वच्छता कामचुकार प्रशासनामुळे ठप्प झाली आहे. उद्यानातील काटेरी झुडपे व सुशोभीकरण तात्काळ झाले पाहिजे.
– पोपट शिंदे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदापूर नगरपरिषद.

इंदापूर नगरपरिषदेचे जे भार्गवराम उद्यान आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी अद्ययावत आराखडा करण्याचे काम नगरपालिकेकडून सुरू आहे. ही बाग चकाचक करण्यात येईल. बंद असलेले कारंज्याचे काम सुरू करण्यात येईल.
– डॉ. प्रदीप ठेंगण, मुख्याधिकारी.

उद्यान प्रमुख नेमले नाहीत
इंदापूर नगरपरिषद ही कोट्यवधी रकमेची विकासकामे सुरू असणारी पुणे जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका आहे. या नगरपालिकेकडून हायटेक यंत्रणा प्रत्येक कामासाठी वापरले असल्याचा गवगवा केला जातो. मात्र, शहरांमध्ये एकमेव उद्यानात सद्यस्थितीला उद्यान प्रमुख कोणालाही नेमले दिसत नाही. मात्र, उद्यानात मुकादम म्हणून एकजण काम पाहतात. त्यांना याठिकाणी काय चालले किंवा नाही याचा मागमूसही नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.