“भारतमाला’मध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग हवा

आमदार सुनील शेळके : केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

वडगाव मावळ – मावळ, खेड व शिरूर तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्राला जोडणारा प्रमुख तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग 548 डी) हा भारतमाला प्रकल्पात समाविष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आमदार सुनील शेळके यांनी दिले.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरून 24 तास औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक व अन्य वाहतूक सुरू असते. हा रस्ता अरुंद असल्याने औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर किरकोळ व गंभीर अपघातात शेकडो बळी गेले आहेत.

सद्यस्थिती या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा साईट पट्ट्या खचल्या आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गावरील खड्डे चुकविताना अवजड वाहनांचा अपघात होत आहेत. अवजड वाहने साईट पट्ट्यावर आल्याने टायर खचत आहेत. अनेकदा या महामार्गावर अवजड वाहने उलटत आहेत. या महामार्गावरून दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचा जीव गुदमरत आहे. या 54 किलोमीटरच्या महामार्गाला दोन ते अडीच तास लागतो. या महामार्गावरून वाहने चालविताना वाहनचालकांची मानसिकता बिघडलेली असते.

मावळ, खेड व शिरूर तालुक्‍यातील विकासाच्या दृष्टीने तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग 548 डी) हा भारतमाला प्रकल्पात समाविष्ठ करावा. काळाची गरज ओळखून आमदार सुनील शेळके यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी (दि. 12) भेटून चर्चा केली. नितीन गडकरी यांनी मुख्य महाव्यवस्थापक तांत्रिक प्रादेशिक अधिकारी मुंबईचे राजेश सिंग यांच्याशी संपर्क साधून तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग 548 डी) चे सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल पाठविण्याच्या आदेश दिला.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा भारतमाला प्रकल्पात समाविष्ट केल्यावर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न संपणार असल्याने वाहतूक सुरळीत होईल. मावळ तालुक्‍याचा विकास होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा केला जाईल.
– सुनील शेळके, आमदार. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.