- सहा ठिकाणी प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे उपलब्ध
पुणे – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालये मिळून “भारत बायोटेक’ यांच्या “कोवॅक्सीन’ लस सहा ठिकाणी प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, ही लस देण्याआधी लाभार्थ्यांकडून सहमतीपत्र घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“सिरम इन्स्टिट्यूट’कडून 1 लाख 63 हजार आणि “भारत बायोटेक’कडून 20 हजार लस राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. त्यातील 1 लाख 63 हजार लसींचे वितरण संपूर्ण राज्यात करण्यात आले आहे. परंतु, “भारत बायोटेक’च्या 20 हजार लसींच्या वितरणाविषयी स्वतंत्र निर्णय घेतला जाणार होता. यात ज्यामध्ये एकगठ्ठा लाभार्थी असतील तेथे ही लस वापरण्यात येणार असल्याचे राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी दोन हजार लस, ग्रॅंट मेडिकल कॉलेज आणि मुंबईतील जे. जे. रुग्णालय येथेही प्रत्येकी दोन हजार तसेच पुणे, अमरावती येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन हजार असे 12 हजार लसींचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार “कोवॅक्सीन’ देण्याआधी संबंधित लाभार्थ्याचे लेखी सहमती पत्र घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या सर्वांचे लस देण्याआधी लेखी सहमतीपत्र घेण्यात येणार आहे. याचा मसुदा केंद्र सरकारनेच ठरवला असून, त्याचा तपशील शुक्रवारी राज्याला उपलब्ध होणार आहे. त्यानुसार ही सहमती घेतली जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
या ठिकाणी देणार
भारत बायोटेक “कोवॅक्सीन’
गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज सोलापूर
गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज औरंगाबाद
गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज नागपूर
ग्रॅंट मेडिकल कॉलेज अँड जे. जे. हॉस्पिटल, मुंबई
जिल्हा रुग्णालय, पुणे
जिल्हा रुग्णालय, अमरावती