सोलापूर : पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी भारतीय जनता पक्षाला कात्रजचा घाट दाखवत अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गेले काही दिवस ते भाजपात जाणार अशी शक्यता व्यक्त होती. मात्र त्यांनी मुंबईत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
पंढरपूरच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांना पूजा करण्यास भालके यांनी विरोध केला होता. मात्र पुढच्याच वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीला आल्यावर भालके यांच्या घरात पाहूणचार स्वीकारला होता. त्यामुळे भालके हे भाजपात जाणार असे संकेत मिळाले होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोध केला होता.
पंढरपूरची जागा सदाभाऊ खोत यांच्या रयत संघटनेला सोडली आहे. त्यांच्याकडून सुधाकर परिचारक निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भालके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला हेवीवेट नेत्याची गरज होती. ती भालके यांच्या प्रवेशाने पूर्ण होणार आहे.