अ‍ॅमेझॉनवर बंदीची मागणी : “कॅट’कडून आज भारत बंदचे आवाहन

40 हजारांहून अधिक व्यापारी भारत बंदचे समर्थन करत आहेत

नवी दिल्ली – देशभरातील व्यापार्‍यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटकडून जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत आज शुक्रवार, दि. 26 रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी व्यापार्‍यांकडून करण्यात आली आहे.

भारत बंदला देशभरातील बाजार बंद राहणार आहेत. सर्व प्रकारचे व्यापार ठप्प राहणार आहेत. देशातील सर्व राज्यातील व्यापार्‍यांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा कॅटकडून करण्यात आला आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी आपले म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीसह देशभरातील जवळपास दीड हजार ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी व्यापार्‍यांकडून जीएसटी पोर्टलवर लॉग इन न करता आपला विरोध दर्शवण्याची योजना आखण्यात आली आहे. देशभरात व्यापार्‍यांचा हा विरोध तर्कसंगत आणि शांतीपूर्ण पद्धतीने पार पडेल. होलसेल आणि रिटेल बाजार पूर्णत: बंद राहतील. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने मात्र या बंदमधून वगळण्यात येतील, असेही कॅटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इंधन भाववाढीच्या पार्श्‍वभूमीवर कॅटच्या भारत बंदला ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनकडूनही समर्थन मिळाले आहे. 26 फेब्रुवारी रोजी चक्का जाम करण्याची योजनाही आखण्यात आली आहे. कॅटसोबत देशभरातील जवळपास 40 हजारांहून अधिक व्यापारी भारत बंदचे समर्थन करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.