कोलकाता -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. या स्पर्धेत अहमदाबाद व लखनौ या दोन नव्या फ्रॅंचाईजी देखील सहभागी होणार आहेत.
या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. त्याचवेळी, सर्व संघांनी अनेक दिग्गजांना आपले प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे केकेआर संघाशी करारबद्ध झाले आहेत. भारतीय संघासह अनेक वर्ष काम केल्यानंतर भरत अरुण यांनी मागील वर्षी विश्वचषकानंतर आपले गोलंदाजी प्रशिक्षकपद सोडले होते. त्यानंतर ते आयपीएल फ्रॅंचाईजी अहमदाबादचे प्रशिक्षक होणार अशी चर्चा होती.
मात्र, दोन वेळा आयपीएल विजेता राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्यांना आपले गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. याबाबतची माहिती केकेआरने ट्विट करत दिली.