पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील खासगी रूग्णालयांकडून करोनाबाधित रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून अव्वाच्या सवा बिल घेतले जात आहे. बेड शिल्लक असताना ते फुल्ल असल्याचे सांगितले जाते. तसेच, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. त्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके खासगी रूग्णालयाची अचानक तपासणी करणार आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
शहरात तब्बल 135 खासगी रूग्णालयात करोनाबाधित रूग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच, कोविड केअर सेंटर आहेत. तेथे ऑक्सिजनबेडसह आयसीयु व व्हेंटीलेटर्सची सुविधा आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांना अधिक शुल्क आकारले जाते. अधिक बिलासाठी रूग्ण व नातेवाइकांची पिळवणूक केली जाते. बेड रिकामे असतानाही ते उपलब्ध नसल्याचे सांगत रूग्णांची अडवणूक केली जाते. अधिक रक्कम उकळून बेड उपलब्ध करून दिला जातो.
तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर वाढलेला आहे. सर्वत्र तुटवडा निर्माण झाल्याने शासनाकडून त्यांचा मर्यादित पुरवठा केला जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करून विक्री केली जात आहे. त्याची बनावट औषध तयार केले जात आहेत. त्यासंदर्भात रूग्णांचे नातेवाईक, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. गरज नसताना रूग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. हे रोखण्यासाठी श्रीकांत सवणे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक खासगी रूग्णालयाची अचानक तपासणी करणार आहे.