भरणे मामांकडे शिकवणी लावायला पाहिजे होती

निधीचे कारण देत भाजपात जाणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा सल्ला

रेडा – सत्तेच्या आश्रयाला पवार साहेबांनी बसविले खूप मोठ्या पदापर्यंत अनेकांना पोहोचले. काही जण म्हणतात की भाजपची सत्ता असल्याने आमच्या मतदारसंघात विकास कामे करता आली नाहीत, म्हणून भाजपत प्रवेश केला. ह्या संगळ्यांना भरणे मामांकडे शिकवणी लावायला पाहिजे होती, असा टोला मारून पक्षामधून जाणाऱ्यांचे आभार कारण नव्यांना संधी मिळणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानामध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला शरण गेले नाहीत, याच करणातून भगवा झेंडा देखील राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबर राहील. भगव्याचा वापर काही नेत्यांनी ठरावीक जातीसाठी केला. पण, भगवा हे त्यागाचे प्रतीक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेणारा भगवा आहे. “अ’ गेला तर “ब’ आहे, “ब’ गेला तर “ड’ आहे. कारण, शरद पवार नावाचे आमच्याकडे विद्यापीठ आहे, असे सांगत असतानाच इंदापूरच्या जागेवर बोला अशी मागणी सभेत होऊ लागल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा चालू आहे. जे धोरण ठरेल त्याबरोबर काम करावे लागणार आहे, असे सांगून पाटील यांनी अधिक बोलणे टाळले.

आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात वाद वेगळा आणि इंदापुरात वाद वेगळा, अशी परिस्थिती असून शरद पवार व अजित पवार यांनी सोपविलेल्या जबाबदारीमुळेच तालुक्‍यात अनेक विकास कामे करु शकलो आहे. मात्र, विरोधक पाण्याचे राजकारण करत असल्याचे भरणे यांनी सांगितले. तर, साखर कारखान्याला कमी दर आणि पूरग्रस्तांना मदत हे नाटक असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता करीत इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच राहावी, अशी प्रखर मागणी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली. यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, जि.प.अध्यक्ष विश्‍वास देवकाते, सभापती प्रवीण माने, सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, महारुद्र पाटील, हनुमंत बंडगर, प्रताप पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.