भंडारदरा धरणाच्या नशिबी एसटी महामंडळाकडून उपेक्षाच

बस रस्त्यातच बंद पडल्याने जागेवरच केल्या जातात उभ्या

अकोले – सौंदर्याचे लेणे घेऊन नटलेल्या भंडारदरा धरण व परिसराच्या नशिबी एसटी महामंडळाकडून खिळखिळ्या गाड्या देऊन उपेक्षाच केली जात आहे.
अकोले आगाराकडून भंडारदऱ्याच्या आदिवासी भागाला पुरविल्या जाणाऱ्या बससेवेत सातत्य ठेवले जात नाही. “खटारा’ गाड्या देऊन आदिवासी प्रवाशांच्या जिवाशी अकोले आगार खेळत असल्याचा प्रकार सुरु आहे.

हा प्रकार जर तातडीने थांबवण्यात आला नाही, तर भंडारदऱ्याच्या आदिवासी भागात एकही बस फिरु देणार नसल्याचा इशारा भंडारदरा परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी समाजभूषण पुरस्कार प्राप्त पांडुंरग इदे यांनी दिला आहे. अकोले आगाराकडून भंडारदरा धरणाच्या परिसरात तसेच पाणलोटात काही ठराविक गाड्या धावतांना दिसत आहेत. पंरतु या गाड्यांची अवस्था अतिशय वाईट अशी झालेली आहे.

भंडारदऱ्याच्या आदिवासी भागात गरीब व अडाणी लोक राहतात. त्यामुळेच की काय? या भागात पाठविल्या जाणाऱ्या अनेक बसेस गरीबच (मोडण्याच्या) स्थितीत आहेत. काही बसेलला खिडकीच नाही. तर काही बसेसचे स्पेअरपार्ट दोरीने बांधलेली दिसत आहेत. अनेकदा या भागात पाठविल्या जाणाऱ्या मुक्कामी बसेस मुक्कामी ठिकाणीच नादुरुस्त होऊन जागेवरच उभ्या राहतात. तर कित्येक गाड्या प्रवाशी वाहतूक करीत असतानाच रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याकारणाने जागेवरच उभ्या राहतात. सदर बस उभी राहिल्याने त्या गाडीतील प्रवाशांना दुसरी गाडी येईपर्यंत सदर ठिकाणी उभे राहून बसची वाट पहावी लागते.

अकोले आगाराचा धूर्तपणा आता उघड झाला आहे. शहरी भागासाठी चांगल्या बस पाठविल्या जात आहेत. तर पर्यटनस्थळ भंडारदरा परिसरात मात्र आदिवासी बांधव आरडाओरडा करीत नसल्याकारणाने नादुरुस्त, खिळखिळ्या गाड्या पाठवून पर्यटक व इतर प्रवाशांच्या सहनशीलतेची कसोटीवर पाहिली जात आहे. याबाबत अकोले आगाराचे आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता आगाराला फक्त 40 गाड्यांचा पुरवठा महामंडळाकडून करण्यात आलेला आहे. आमच्यापुढे दुसरा पर्याय नसल्यानेच आम्ही या बसेसचा वापर करत आहोत, असे सारवासारव करणारे उत्तर त्यांनी दिले.

अकोले आगाराच्या रतनवाडी व साम्रद या दोन बस मुक्कामी जातात. या गाड्यांचा भंडारदरा येथे सायंकाळी 5.30 वाजता पोहोचण्याची वेळ आहे. परंतु अकोले आगाराच्या आगार प्रमुखांनी या गाड्यांना दुसरीकडे ट्रीप जोडल्याने भंडारदरा येथे या बस रात्री 7 वाजता येत असल्याकारणाने अनेक प्रवशांना बसची वाट बघत बसावे लागते. तर कधी कधी गाडीच न आल्याने जंगलातून अंधारात वाट काढत पायी प्रवास करावा लागतो.

बस आगाराच्या चालक व वाहकांना या संदर्भात विचारले असता आम्ही कायम आगारात वेळेच्या अगोदर येऊनही गाडीच लवकर न दिल्याने गाड्या उशिरा धावतात. अकोले आगाराचे जे प्रमुख अधिकारी आहेत तेच मनमानी कारभार करत असल्याकारणाने आदिवासी भागातील प्रवाशांवर नादुरुस्त गाड्यामध्ये जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

तसेच महिन्यातून 15 दिवस दुपारी घाटघर येथे जाणारी बस शेंडीतूनच परस्पर परत फिरत असल्याची अधिकृत माहिती घाटघर येथील सरपंचांनी दिली आहे. या बसचे किलोमीटर मात्र आगारप्रमुख कार्यालयीन हिशोबात लावताना दिसून येत आहेत. आगार प्रमुखांच्या पगारातून घाटघरला न गेलेल्या बसच्या किलोमीटरचे पैसे वसूल करण्यात यावे, अशी मागणी केली जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.