भंडारदरा 87, तर निळवंडे 78 टक्के!

अकोले – भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आज (सोमवार) 9 हजार 679 दशलक्ष घनफूट होऊन धरण भरण्याच्या मार्गावर आहे. निळवंडे धरणाचाही पाणीसाठा 6 हजार 422 दशलक्ष घनफूट होऊन धरण 78 टक्के भरले आहे.
भंडारदरा पाणलोटक्षेत्रात जोरदार सुरू असलेला पाऊस मंदावला असला, तरी धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने काल 24 तासांत 353 दलघफू नवीन पाण्याची आवक होऊन धरणाचा पाणीसाठा 9679 दलघफू होऊन धरण 87 टक्के भरले आहे. निळवंडे धरणात 233 दलघफू नवीन पाण्याची आवक होऊन धरणात 6422 दलघफू पाणीसाठा होऊन धरण 78 टक्के भरले आहे.
काल (रविवार) 24 तासांत घाटघर 52 मिमी, रतनवाडी 63 मिमी,पांजरे 42 मिमी, वाकी 23 मिमी, भंडारदरा 32 मिमी, निळवंडे 9 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
भंडारदरा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. उंच कोसळणारे धबधबे व हिरवाईने नटलेला परिसर, तसेच पावसाच्या रिमझिम सरीत भिजण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. या वाढत्या पर्यटकांमुळे या भागातील आदिवासी लोकांना रोजगारही उपलब्ध झाला.





