भंडारा – जम्मू – काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय सैन्याच्या वाहनाला अपघात झाला. यात भंडारा जिल्ह्यातील सुपुत्राचे निधन झाले. संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे (वय 36) असे अपघाती निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. संदीप हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते. काल ते कर्तव्यावर असताना कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगणवरून विलगीकरण केंद्राकडे जात होते. यावेळी सरकुल्ली येथे अनियंत्रित गाडीला अपघात झाला. यात संदीप यांच्यासह इतर पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर 168 मिलिट्री हॉस्पिटल ड्रगमुल्ला येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान संदीप भोंडे यांचा मृत्यू झाला.
उद्या भंडाऱ्यात अंत्यसंस्कार
संदीप हे 2008 मध्ये 21 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. 2016 ला त्यांचा विवाह झाला. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. नुकतीच 75 दिवसांची रजा आटोपून ते पाच मार्चला कर्तव्यावर हजर झाले. आपल्या पोस्टिंग झालेल्या स्थानी जात असताना वाटेतच जवानांच्या झालेल्या अपघातात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. संदीप यांचा मृतदेह उद्या, शनिवारी भंडारा शहरात पोहचणार आहे. शासकीय इतमामात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या दुर्देवी मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
संदीप यांचे वडील नुकतेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचे वडील आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये वाहन चालक होते. मूळचे मोहाडी येथील डोंगरगाव येथील रहिवासी आहेत. काकासुध्दा पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले. एक लहान भाऊ व बहीण आहे. होळी निमित्ताने पुन्हा ते परत येणार होते.