संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने “सवाई’त उमटले भक्तीसूर : रसिक मंत्रमुग्ध
अमिता सिन्हा-महापात्रा, जान्हवी फणसळकर यांच्या धृपद गायनाला उत्स्फूर्त दाद
पुणे – धृपद सिस्टर्सच्या गायनाने “सवाई’च्या पहिल्या सत्राची सुरेल सुरुवात झाली. तर संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने तिसऱ्या दिवसाची सांगता झाली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
“धृपद सिस्टर्स’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमिता सिन्हा-महापात्रा, जान्हवी फणसळकर यांचे धृपद गायन तर अनुजा बोरुडे यांच्या पखवाज वादनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची बहारदार सुरुवात झाली. त्यांनी राग भीमपलासने गायनाची सुरुवात करून आलाप, मध्यलय आलाप, द्रुत आलाप सादर केला. त्यानंतर चौतालातील “कुंजन मे रचो रास…’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर राग चारुकेशीमध्ये “झिनी झिनी चदरिया…’ हे त्यांचे गुरू पंडित रमाकांत गुंदेचा यांनी संगीतबद्ध केलेले आणि संत कबिरांचे पद त्यांनी सादर करून आपल्या मैफलीला विराम दिला. त्यांना सुधा आणि पवी यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली.
यासह मूळचे स्वित्झर्लंडचे असलेले केन झुकरमन यांच्या सरोद वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. केन झुकरमन हे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य असून त्यांनी राग चंद्रनंदनने वादनाची सुरुवात करत तीनतालातील दोन रचना सादर केल्या. त्यानंतर राग गोरख कल्याणमधील रचना सादर करून आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना रामदास पळसुले (तबला), अनूप जोशी (तानपुरा) यांनी संगत केली. महोत्सवाच्या उत्तरार्धात संगीतमार्तंड पंडित जसराज यांनी राग जयजयवंतीमध्ये “जय जय सिद्धी..’ या रचनेने आपल्या गायनाची सुरुवात केली. रसिकांच्या विशेष आग्रहास्तव “हनुमान लला’ ही रचना सादर केली.
“रसिकांच्याच आशीर्वादामुळेच मी गाऊ शकत आहे,’ अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांना मुकुंद पेटकर (हार्मोनियम), रामकुमार मिश्रा (तबला), अंकिता जोशी (तानपुरा), रतन मोहन शर्मा, तृप्ति मुखर्जी, सुरेश पत्की, दुर्गा जसराज यांनी साथसंगत केली.
विराज जोशीच्या गायनाने श्रीनिवास जोशी भावूक
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू आणि श्रीनिवास जोशी यांचे शिष्य, सुपुत्र विराज जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग पुरियाधनश्रीने गायनाची सुरुवात केली. “सुमिरन तेरो नाम..’ या बंदिशीने रागाचा विस्तार केला. त्यानंतर “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल..’ हा अभंग सादर केला. पंडितजींची आठवण करून देणाऱ्या ताना आणि सुरेल ठेहरावयुक्त सादरीकरणाने विराजला “वन्स मोअर’ मिळाला. त्याने पंडितजींच्या शैलीत “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ ही रचना देखील सादर केली. यावेळी त्यांना पांडुरंग पवार (तबला), अविनाश दीघे (हार्मोनियम), विनायक कोळी, मोहसिन मिरजकर, मुकुंद बादरायणी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. यावेळी श्रीनिवास जोशी भावूक झाले होते.