भक्‍ती शक्‍ती उड्डाणपुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर – महापौर

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून वाहतुकीचे सक्षमीकरण
पिंपरी  – जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील शहराचे प्रवेशव्दार असलेल्या भक्ती शक्ती चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भक्‍ती शक्‍ती चौक निगडी येथे ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल साकारण्यात येत आहे. या पुलामुळे वाहतुकीचे सक्षमीकरण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.

आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ यमुनानगर येथे झालेल्या बैठकीत महापौर जाधव बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पुणे मुंबई रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले. हे चित्र बदलण्यासाठी व वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.

हा पूल तीन मजली उभारण्यात येत आहे. जमिनीखालून ग्रेडसेपरेटर, रोटरी जमिनीच्यावर व रोटरीच्या वरती पूल अशी रचना असलेल्या पुलाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी अंदाजित 121 कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला. निविदा स्वीकृती 90 कोटी रुपयांची झाली. ऑगस्ट अखेरीस या पुलावर 58 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर पुलाचे काम 62 टक्के पूर्ण झाले आहे.
महापौर जाधव म्हणाले की, भक्‍ती शक्‍ती ते मुकाई चौक हा 45 मीटर रुंद बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गातर्फे देहुरोड ते निगडी या राष्ट्रीय हमरस्त्याचे रुंदीकरणाचे काम लवकरच चालू करण्यात येणार आहे. भक्‍ती शक्‍ती चौकामध्ये बीआरटीएसचे टर्मिनल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. निगडी दापोडी बीआरटीएस बससेवा सुरू झाली आहे. भक्‍ती शक्‍ती चौकातील तीन पातळ्यात होत असलेल्या पुलामुळे प्राधिकरण ते मोशी दक्षिण उत्तर शहर जोडले जाणार आहे.

प्राधिकरणाकडून पुणे भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधून स्वतंत्र पूल उपलब्ध होईल. या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नाशिक फाटा उड्डाणपुलाप्रमाणे या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असेही ते म्हणाले. डिसेंबर 2019मध्ये कामाची मुदत संपत आहे. मात्र महापारेषणची अति उच्चक्षमतेची विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यासाठी उशीर झाल्याने दोन गर्डर करण्यास आणखी सहा महिने लागणार असल्याचेही महापौर जाधव यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here