वाघोली (पुणे) – करोना परिस्थिती अद्यापही पूर्णपणे संपलेली नाही. अनेक ठिकाणी करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे वाघोलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची (दि. 26) व (दि. 27) फेब्रुवारी रोजी होणारी यात्रा साधेपणाने साजरी केली जाणार आहे. यात्रा यंदा साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव सातव पाटील यांनी दिली.
करोना पार्श्वभूमीवर यावर्षी भैरवनाथ मंदिरात यात्रेनिमित्त फक्त पानफुल, होम हवन, धार्मिक विधी व नित्य पूजा केली जाणार आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला वाघोलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात्रेनिमित्त आखाडा, तमाशा, ढोल-लेझीम खेळ, दारूगोळा आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यावर्षी करोनाची परिस्थिती असल्यामुळे वाघोलीतील अनेक सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे केले गेले आहेत. करोनाचे संकट अजूनही संपूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी वरील निर्णय घेतला आहे.