कोरगाव भीमा (वार्ताहर) – येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची मंगळवार (दि. 14) व बुधवार (दि. 15) रोजी होणारी यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून कोणताही कार्यक्रम होणार नसल्याची माहिती कोरेगाव भीमा यात्रा समितीचे दत्तात्रय संभाजी ढेरंगे व अशोक गव्हाणे यांनी दिली.
करोना विषाणूने जगात थैमान घातले असताना सरकार व विविध यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून समाज रक्षणासाठी अहोरात्र राबत आहे. देवाची यात्रा जरी रद्द करत असलो तरी आपण देवाला गरीबांमध्ये शोधून त्यांना आवश्यक ती मदत करणे म्हणजे देवाची यात्रा साजरी करणे होय. देव माणसात आहे व त्याला गरीब व गरजू लोकांत शोधण्याची हीच खरी वेळ असून हीच त्याच्या सेवेची संधी होय. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.