भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था प्रकरण; 12 ठिकाणी धाडी; ट्रकभर पुरावे

  • लॅपटॉप, पीसीओसह डिजिटल साहित्य हस्तगत
  •  जळगाव, औरंगाबादेतून महत्त्वाची कागदपत्रे जप्त
  • राजकीय टोलेबाजी सुरू असताना पोलिसांची “सिंघम स्टाइल’

 

पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ट्रकभर पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या 12 ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. शिवाय औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

 

याप्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, गुंतवणूकदारांच्या तक्रारींवरुन हा गुन्हा दाखल पोलिसांनी सांगितले आहे. “बीएचआर’संबंधित कारवाईसाठी पुणे पोलिसांनी संपूर्ण गुप्तता पाळली होती. याप्रकरणी डेक्कन, पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे 3 गुन्हे दाखल आहेत. दोन पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 25 सहायक निरीक्षक आणि 100 पोलीस कर्मचारी असा पुणे, पिंपरी आणि ग्रामीण पोलिसांच्या फौजफाट्याने जळगावमध्ये गेल्या शुक्रवारी भल्या सकाळी छापा टाकला होता. त्यात जळगावमधील 12 ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन इतर ठिकाणी तसेच औरंगाबाद येथे झडत्या घेण्यात आला.

 

 

सुमारे ट्रक भरुन मिळालेल्या या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. त्यातील कोणते दस्तावेज बॅंकेने केलेली आहेत आणि कोणते आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून करुन घेतलेली कागदपत्रे आहेत? ही कागदपत्रे लिलावामधील आहेत, की तारण म्हणून घेतलेली आहेत? याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे कारण स्वतंत्र पथक करत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी करुन त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने आणखी काही दिवस लागणार आहेत.

 

 

कारवाईचे ठेवीदारांकडून स्वागत

पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे “बीएचआर’चे ठेवीदार, गुंतवणूकदार, ग्राहकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. “या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत. पोलिसांच्या कारवाईने आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा वाटत आहे’ असे ठेवीदार म्हणत आहेत. “बीएचआर’शी संबंधित अनेक जण आर्थिक गुन्हे शाखेत येऊन पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.