भगवंत मान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा
Updated On:

नवी दिल्ली -पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी खासदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेवर निवडून जाऊन मुख्यमंत्री बनण्यास सज्ज झाल्याने त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व सोडले.
मान यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सादर केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून आम आदमी पक्षाने (आप) पंजाबची सत्ता काबीज केली. मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवून आपने ती निवडणूक लढवली. आता आपच्या सरकार स्थापनेची औपचारिकताच तेवढी बाकी आहे.
मान 16 मार्चला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. त्यातील तब्बल 92 जागा जिंकत आपने तीन-चतुर्थांश बहुमत मिळवले. त्यामुळे दिल्लीपाठोपाठ पंजाबच्या रूपाने दुसऱ्या राज्याची सत्ता त्या पक्षाने हस्तगत केली आहे.





