Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तीन वर्षांपूर्वी कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. मात्र, त्याच कोश्यारींना आता देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानं विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका करत, “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान केला जातो,” असा आरोप केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया देत, “कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांच्या कटु आठवणी अजूनही ताज्या आहेत,” असं स्पष्ट केलं. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी मात्र या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर पलटवार केला आहे. पुरस्काराला विरोध करणं म्हणजे ‘छोट्या मनाचं राजकारण’ असल्याचं सत्ताधारी नेत्यांनी म्हटलं आहे. या वादावर स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनीही प्रतिक्रिया देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. “मी कोणाची प्रशंसा किंवा निंदा व्हावी म्हणून काम करत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि भूमिकांमुळे सातत्याने चर्चेत होते. विधानपरिषदेच्या १२ जागांवरील नियुक्त्या, तसेच मध्यरात्री झालेला शपथविधी या मुद्द्यांमुळे त्यांचा कार्यकाळ मोठ्या वादात सापडला होता. विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर कोश्यारी यांनी अचानक राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानं राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. अशा पार्श्वभूमीवर आता त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. Bhagat Singh Koshyari Padma Bhushan Controversy महाराष्ट्राचे माझी राज्यपाल कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं, अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं. पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना “कल्पना करा की सावित्री बाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतिचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं होतं. हेही वाचा : Bhagat Singh Koshyari : “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते”; भगतसिंह कोश्यारींना पद्म भूषण पुरस्कार जाहीर होताच ठाकरे गटाकडून संताप व्यक्त