आळेफाटा (वार्ताहर) – कल्याण-माळशेज-नगर निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र 61 च्या दुहेरी काँक्रिटीकरण च्या चालू रस्त्याच्या कामासाठी पर्यायी मार्गाने दि 19 मे पासून पुढील प्रत्येक गुरुवारी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु ठेवण्याचे आवाहन सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग मुरबाड यांच्या वतीने करण्यात आले.
त्यानुसार तहसील कार्यालय मुरबाड व जुन्नर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरोली, ओतूर, आगारप्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ओतूर, आळेफाटा, मुरबाड, कल्याण, नारायणगाव, अहमदनगर यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग 61 मध्ये किलोमीटर 84 ते 101पर्यंत दुहेरी काँक्रिटीकरण करण्यासाठी पुणे जिल्यातील लांबी किमी 98.600 ते 100.280 मध्ये 19 मे पासून पुढे प्रत्येक गुरुवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दगड फोडण्यासाठी विस्फोटाचा वापर करण्यात येणार आहे.
त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहे.त्यानुसार कल्याण माळशेज घाट-खुबी-करंजाळे-खिरेश्वर ते कोल्हे वाडी-सांगणोरी- पिंपळगाव जोगा ते भोईरवाडी कोळवाडी ओतूर आळेफाटा कल्याण असा पर्यायी वाहतूक बदल असणार आहे.यादरम्यान अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असणार आहे.
आळेफाटा मार्गे कल्याण ला प्रवास करताना मढपासून पुढे खुबी फाट्यापर्यंत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे .दैनंदिन शेकडो वाहनांना या खराब रस्त्याचा नाहक त्रास होत आहे. यासाठीच प्रशासनामार्फत खराब रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले आहे.