सावधान…! बाधितांसह मृतांची संख्याही वाढतेय

वाढत्या आकड्यांमुळे पुण्यात करोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक


दि. 13 मार्चपासून मृतांची संख्या दररोज दोन आकडी

पुणे – शहरात करोना बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. बाधितांची संख्या 15 फेब्रुवारी 2021 पासून वाढायला सुरूवात झाली आणि मृतांची संख्या 13 मार्चपासून वेगाने वाढत आहे, असे पालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

शहरात 15 फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या वाढण्याला सुरूवात झाली. अगदी दिवसाला 98 झालेली बाधितांची संख्या आता 6 हजारांवर पोहोचली आहे. त्या तुलनेत मृतांची संख्या कमी असली आणि एकूणच बाधितांच्या तुलनेत मृत कमी असल्याने मृत्युदर कमी दिसत असला, तरी मुळात मृतांच्या संख्येत वाढच झाली आहे. 16 फेब्रुवारी रोजी एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांची संख्या वाढण्याला सुरूवात झाली. ती पाच, सहा, सातच्या दरम्यान होती.

मात्र, 13 मार्चपासून मृतांची संख्या दोन आकडी झाली. 13 मार्च रोजी मृतांची संख्या 12 होती. त्यानंतर 15, 22 अशी वाढली. मध्येच ती 11 वरही आली परंतु त्यानंतर ती 20 च्या पटीतच गेली. 31 मार्च रोजी मृतांची संख्या 32 झाली. त्यानंतरही एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून ती 30 च्या घरात गेली आणि 4 एप्रिल रोजी 41, तर 5 एप्रिल रोजी 36 मृतांची नोंद करण्यात आली.

मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनी, यकृतासंबंधीचे रोग असणे, वय जास्त, उशिरा उपचार घेणे, अंगावर काढणे आणि अन्य गुंतागुंत असल्यामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. या आधीही अशाचप्रकारची कारणे होती. मात्र आता बाधितांची संख्याही वाढत चालली आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.