काळजी घ्या…पुणे पुन्हा तापणार

शहरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
कमाल तापमान पुन्हा उच्चांक गाठण्याचा अंदाज

उष्माघाताचा धोका
नागरिकांनी आवश्‍यकता असेल, तरच घराबाहेर पडावे. नाका-तोंडाला रूमाल बांधावा, डोक्‍यावर टोपी किंवा पांढरा रुमाल वापरावा. गाडी चालविताना किंवा रस्त्याने चालताना उन्हाचा चटका जाणवत असेल आणि डोळे आपोआप मिटत असतील, तर शांत सावलीमध्ये बसून थोड्यावेळाने पुरेसे पाणी प्यावे आणि डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. कारण, उष्णतेची लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्‍यता असते.

पुणे – शहरातील कमाल तापमान पुन्हा वाढू लागल्यामुळे दुपारचा चटका असह्य होत आहे. हा चटका अंगाची लाही लाही करत आहे. पुढील चार दिवसात दि. 20 ते 22 मेदरम्यान पुण्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळेब तापलेला सूर्य एप्रिलमधील उच्चांक परत मोडणार, असा अंदाज आहे.

मागील पंधरा दिवसांत कमाल तापमानात सतत चढ-उतार सुरू होता. दिवसा ऊन आणि रात्री गारवा असा अनुभव पुणेकर घेत होते. मात्र, दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानाने चाळिशी गाठली असून, रात्रीचा उकाडाही वाढला आहे. शनिवारी (दि.18) शहरातील कमाल तापमान 40.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

दरम्यान, शुक्रवारी (दि.17) 40, तर गुरूवारी (दि. 16) 39.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे एप्रिलमधील उन्हाच्या चटक्‍याची आठवण होत असून, पुढील चार दिवसांत पुन्हा हा चटका नागरिकांना सोसावा लागणार आहे. हवामान विभागाने दर्शविल्याप्रमाणे दि. 18 आणि 19 रोजी शहरातील कमाल तापमान 41 अंशाच्या आसपास असेल तर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्‍यता आहे. दि. 20, 21 आणि 22 रोजी शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.