सातारा – शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातून आणि माण-खटाव मतदारसंघातील जनतेकडून भरभरून मते घेतली. मात्र, कोणतीच विकासकामे केली नाहीत. निवडणुका आल्या की, ते काड्या घालायचे काम करतात. त्यांनी आजपर्यंत सोयीचेच राजकारण केले आहे. जातीवंत राजकारणाशी त्यांचा कधीही संबंध आला नाही. माण-खटावमधील त्यांचे बगलबचेही जातीपातीत भांडणे लावायचे उद्योग करत आहेत. अशा आगपेट्यांपासून जनतेने सावध राहावे, असे आवाहन आ. जयकुमार यांनी केले.
माण-खटाव मतदारसंघातील प्रचारार्थ निमसोड गटातील गावभेट दौर्यात ते बोलत होते. ते म्हणाले, विधानसभेच्या माझ्या प्रत्येक निवडणुकीत मी नवीन उद्दिष्ट ठेवून जनतेसमोर गेलो. वेळेचे बंधन घालून प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करत आलो. त्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. माण-खटावच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. बारा वर्षांपूर्वी सुरुवातीला उरमोडीचे पाणी मतदारसंघात आणून दुष्काळमुक्तीच्या लढाईची सुरुवात केली. हे पाणी दोन्ही तालुक्यांच्या लाभक्षेत्रात पोहोचवून मतदारसंघाची समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. तारळी आणि जिहे-कठापूरचे पाणी आल्याने बागायती शेतीचे स्वप्न पूर्णत्वाकडे आहे.
जिहे-कठापूरचे पाणी वंचित भागाला देणार्या योजना कार्यान्वित होत आहेत. टेंभूचे अडीच टीएमसी पाणी मतदारसंघातील 52 गावांमध्ये येण्यासाठी कामे सुरू आहेत. दुष्काळी भागाचे नंदनवन करण्यासाठी पाणी योजना मार्गी लावण्याचे काम मी प्राधान्याने केले आहे. पाणी आल्याने दुष्काळाचे मळभ दूर होत आहे. येत्या तीन वर्षांत माझी दुष्काळमुक्तीची लढाई संपलेली असेल.
पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी माण-खटावच्या पाणी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. या भागासाठी पाणीच उपलब्ध नाही, तर देणार कुठले, असा प्रश्न फलटण, बारामतीकरांनी उपस्थित करुन जनतेला झुलवत ठेवले. त्यांच्या नाकर्तेपणामुळे माण-खटावमध्ये असंतोष पसरला होता. त्यांनी पाणी आणले नाही, म्हणूनच मला ते शिवधनुष्य उचलावे लागले. भाजप महायुतीचे सरकार सर्व समाजघटकांच्या पाठीशी ठाम राहिले आहे.
महिला, शेतकरी, युवक, युवतींसाठी विविध योजना राबविण्यात आमचे सरकार आघाडीवर राहिले. यापुढेही सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. माण-खटाव मतदारसंघातील आमच्या विरोधातील गावोगावचे स्वयंघोषित पुढारी हे खरे तर वाजंत्री आहेत. मात्र, ते नवरदेव व्हायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून खोटी ‘नॅरेटिव्ह’ तयार केली जात आहेत. त्यांचे मनसुबे जनतेने चांगलेच ओळखले आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही आणि कामांबाबत सांगण्यासारखे काही नाही. या निवडणुकीत त्यांचे कुटील मनसुबे जनता यशस्वी होऊ देणार नाही.
भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’
आ. गोरे यांच्या गावभेट दौर्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीत भवितव्य नसल्याचे लक्षात यायला लागल्याने अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये आ. गोरेंच्या गटात ‘इनकमिंग’ जोरात आहे. ज्यांनी विविध योजनांचे पाणी मतदारसंघात आणून दुष्काळी कलंक पुसण्याचे आणि पुढच्या पिढ्यांचे भले केले आहे त्या आ. गोरेंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपची विचारधारा स्वींकारत असल्याचे त्यांनी सांगितले.