मुंबई – सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामध्ये मध्यमवयीन व्यक्तींचा मुख्यतः समावेश आहे. अशा व्यक्ती बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यांना एक मेसेज वा ई-मेल येतो की ज्यात असे लिहिलेले असते ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या वेबसाईट बघत होतात व आम्ही ते प्रदर्शित करू शकतो आणि तसे नको असल्यास एका विशिष्ट अकाऊंटमध्ये काही रक्कम भरा इत्यादी’.
आपण चुकून किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करू नका. सदर वेबसाईट या सेफ नसून कधीतरी तुमच्या नकळत अशा वेबसाईटवरून एखादे रॅनसमवेर (Ransomware) किंवा व्हायरस डाऊनलोड होऊ शकतो जो तुमच्या इंटरनेटवरील गतिविधी व तुमच्या कॉम्प्युटरमधील माहिती जमा करून सायबर भामट्यांना पाठवतो आणि मग असे मेसेज येतात.
जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही, आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्या. तसेच सर्व नागरिकांनी हे पण लक्षात ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे की आपल्या देशात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ब अन्वये चाईल्ड पोर्नोग्राफि (child pornography) शोधणे देखील गुन्हा आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने करण्यात येत आहे.