Prakash Ambedkar | Reservation News – कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. कुणबी हे स्वतःला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसह आहे असे आमदार सांगतो. याचाच अर्थ तो आमदार धनगरांबरोबर, माळी समाजाबरोबर, वंजारी, लिंगायत, बंजारा समाजाबरोबर नाही. तसेच तो तेली, तांबोळी, लोहार, सोनार यांच्याबरोबर तर अजिबात नाही, असा हल्लाबोल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामुळे आरक्षणाचा मुद्दा तापलेला दिसत आहे. एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आक्रमक आहेत. दुसऱ्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो.
तो धनगरांसोबत, माळ्यांसोबत, वंजारी, लिंगायत आणि बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही. म्हणून मी सावध राहा असे सांगत आहे. कारण ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल. माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की, ओबीसींची जातनिहाय गणना झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी सभेत केली.