इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत संपल्यानंतर आता करदात्यांच्या बॅंक खात्यात टॅक्स रिफंड जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. बनावट लिंक्सचे एसएमएस पाठवून करदात्यांना टॅक्स रिफंडचे अमिष दाखवू लागले आहेत. अशा कोणत्याही लिंक्सवर क्लिक करून गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकू नका, असे आवाहन प्राप्तीकर विभागाकडून करण्यात आले आहे.
Important alert! Dear xxxxxxxx, the lncometax Department requires you to click the link below to submit a formal request for the payment of your unclaimed and overdue tax-refund of xx,xxx INR. http://151.80.90.62/ITRefund.
अशा प्रकारचे एसएमएस अनेकांच्या मोबाइलवर पाठवले जात आहेत. असे मेसेज बनावट आणि फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवले जात असल्याचे प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले आहे.
प्राप्तीकर खात्याच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये बनावट रिफंड ई-मेल्स, फिशिंग एसएमएस आणि प्राप्तीकर खात्याच्या बनावट वेबसाईट कशा ओळखायच्या याची माहिती आहे. प्राप्तीकर खाते करदात्यांकडे वैयक्तिक माहितीचा तपशील, पिन नंबर, पासवर्ड, क्रेडिट कार्ड किंवा बॅंक खात्याची माहिती विचारत नाही किंवा तशी मागणी करणारे मेल, एसएमएस पाठवत नाही. अशा एसएमएस किंवा मेलमधील लिंकमध्ये व्हायरस असू शकतो आणि त्यामुळे तुमच्या संगणक, मोबाइलमधील माहितीला धोका निर्माण होऊ शकतो.