मुंबई – बनावट किंवा अनधिकृत कर्ज देणाऱ्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपपासून सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने आवाहन केले आहे.
अनाधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे वेगवान कर्ज पुरवठा करण्याच्या आमिषाला अनेक नागरिक व छोटे उद्योग बळी पडले आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने हे आवाहन जारी केले आहे.
अशा अनधिकृत मोबाइल ॲप चालविणाऱ्यांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त व्याज वसूल केले जाते. व्याज वसुलीसाठी अयोग्य मार्गाचा अवलंब केला जातो. ग्राहकांच्या फोनवरील माहितीचा दुरुपयोग केला जातो, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
त्यामुळे नागरिकांनी शहानिशा करून अधिकृत मोबाईल ॲप किंवा वेबसाईटचा वापर करावा. त्याचबरोबर ग्राहकांनी केवायसी कागदपत्राची माहिती अनोळखी व्यक्तींना किंवा अनोळखी ॲपना उपलब्ध करू नये. अशी माहिती कुणी मागितल्यास त्यासंदर्भात कायदा अंमलबजावणी संस्थांना याची माहिती द्यावी, असे बॅंकेने म्हटले आहे.