कॉंग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा- नितीन गडकरी

नितीन गडकरी गांधी-नेहरू यांचे आश्‍वासन पूर्ण केले
नागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (22 डिसेंबर) नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे आयोजन लोकाधिकार मंचच्या वतीने करण्यात आले होते.

या मोर्चात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चानंतर झालेल्या सभेत नितीन गडकरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.

कॉंग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा, असा सल्ला देतानाच देशातल्या नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्‍यकता नाही, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. यावेळी गडकरी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला. गडकरी म्हणाले, कॉंग्रेसने मुस्लिमांना केवळ व्होट मशीन म्हणून वागणूक दिली आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा मुस्लीमविरोधी नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच हिंदू असणं पाप आहे का? असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूच्या परिस्थितीवर भाष्य केले.

आपल्या देशातल्या मुस्लीम घुसखोरांना आश्रय देण्यासाठी या जगात 100 ते 150 मुस्लीम देश आहेत. परंतु पाकिस्तानातले हिंदू 19 टक्‍क्‍यांवरुन 3 टक्‍क्‍यांवर आले आहेत. त्यांच्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणताही देश नाही.
गडकरी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडीत नेहरु यांनी शरणार्थींना आश्रय देण्याचे आश्वासन दिले होते.

आपण ते पूर्ण केले पाहिजे. आपले सरकार तेच काम करत आहे. आपले सरकार शरणार्थींना नागरिकत्व देत आहे. यामध्ये सरकारचं काय चुकलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. फडणवीस म्हणाले की, काही लोक जाणून बुजून लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.