जुन्नर(प्रतिनिधी) – गेल्या महिन्यात केवळ एक रुग्ण करोनाबाधित असलेल्या जुन्नर तालुक्यात आज नव्याने चार पाहुण्यांची चाचणी पॉजिटिव्ह आल्यामुळे संपुर्ण तालुका हादरला आहे. हे चारही पाहुणे शहरातून काही दिवसांपूर्वी गावांमध्ये आलेले आहेत. धोलवड व सावरगाव या गावांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण पॉजिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णाची संख्या आता पाच झाली असून नागरिकांनी घाबरून न जाता शक्यतो घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यामुळे पुण्या-मुंबईकडून वैध-अवैध मार्गाने जुन्नरकर मंडळी कोरोना बाधित क्षेत्रातून रात्री अपरात्री कुटूंबासह गावी येत आहेत. दोन महिन्यांपासून पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात करोनाचा अटकाव झाला होता.
तसेच स्थानिक तरूण मंडळी, गावोगावचे लोकप्रतिनिधी यांनीही मोठी भूमिका निभावली होती. मात्र राज्यशासनाने दारूविक्री तसेच प्रवासाबाबत नियमांमध्ये ढील दिल्यामुळे शहरातील करोना राक्षसाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. दरम्यान धोलवड व सावरगाव या भागांतील वास्तव्य असलेल्या करोनाबाधित रुग्णांची हिस्टरी तपासण्यास सुरुवात झाली असून ही क्षेत्रे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.