मतदाराची तक्रार खोटी ठरल्यास खावी लागणार जेलची हवा
पुणे – विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) हे मशीन जोडले जाणार आहे. यामुळे ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत 7 सेंकद दिसणार आहे. जर एखाद्या मतदाराने “मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅटवर दिसले नाही’, “दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले’ अशी तक्रार केल्यास आणि ती तक्रार खोटी ठरल्यास संबंधित मतदाराला जेलची हवा खावी लागणार आहे. या प्रकरणी संबंधित मतदाराला सहा महिन्यांची कैद अथवा 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.
सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहे. मतदाराने मतदानावेळी या व्हीव्हीपॅटवर आक्षेप नोंदविला आणि “ज्या उमेदवाराला मत दिले त्या उमेदवाराचे चिन्ह व्हीव्हीपॅटवर न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले,’ अशी तक्रार केली तर त्या तक्रारीची दखल संबंधित मतदान केंद्रस्तरीत अधिकारी घेणार आहे. संबंधित मतदाराला खरच असा प्रकार घडला आहे का, याची विचारणा अधिकारी करणार आहेत.
जर मतदार त्या तक्रारीवर ठाम असेल, तर त्या मतदाराकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जामध्ये जर मतदार खोटे बोलत असेल तर 6 महिने शिक्षा अथवा 1 हजार रुपये दंड होऊ शकतो. या नियमाची माहिती या अर्जामध्ये असणार आहे. त्यानंतर त्या मतदाराला पुन्हा “टेस्ट व्होट’ची संधी दिली जाणार आहे. यावेळी त्या मतदारासोबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित राहणार आहेत. जर “टेस्ट व्होट’मध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मतदाराला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
शंका राहणार नसल्याचा दावा
विविध निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप करण्यात आले होते. मशीनमध्ये “सेंटिंग’ केलेली आहे. त्यामुळे “हा उमेदवार विजयी झाला’, “कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते’, असे अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या. तसेच काही जणांनी याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या पार्श्वभूमीवर कोणाला मतदान केले याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपॅटवर दिलेले मत प्रिंट स्वरूपात दिसण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे कोणतीही शंका राहणार नसल्याचा दावा आयोगाने केला आहे.