नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे.
आज दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मोदी देशातील करोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. देशात कमी झालेली करोना रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज ही बैठक घेणार आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत देशात करोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या करोना आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोविडची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.