नवी दिल्ली – भारतवर ब्रिटनचे 1765 पासून 1947 पर्यंत विविध भूभागावर राज्य होते. या काळात ब्रिटनने भारताची बरीच लूट केली. मात्र याचे मूल्यांकन आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. आता एका मूल्यांकनानुसार केवळ 1765 ते 1900 या कालावधीत ब्रिटनने भारताची तब्बल 64.82 लाख कोटी डॉलरची लूट केली आहे.
यातील निम्मी रक्कम ब्रिटन मधील तेव्हाच्या दहा टक्के श्रीमंताकडे गेली. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत दहा टक्के लोकांनी भारतातून 33.8 लाख कोटी डॉलरची लूट केली असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम इतकी जास्त आहे की यातून पूर्ण लंडन शहरावर पन्नास पाऊंडच्या नोटा चार वेळा अंथरल्या जाऊ शकतील. भारताचे सध्याचे राष्ट्रीय उत्पन्न केवळ 3.7 लाख कोटी डॉलर आहे. हा अहवाल ऑक्सफॅमतर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये उत्सा पटनाईक आणि प्रभा पटनाईक यांच्या या विषयावरील पुस्तकाचा हवाला देण्यात आला आहे.
सध्या ब्रिटनमध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या श्रीमंतीचे मूळ ब्रिटनच्या साम्राज्यवादात जाते. विशेषत: ज्यांनी गुलाम बाळगले होते त्याना गुलामगिरी संपल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे या लोकांचे श्रीमंती वाढली होती.
आता जागतिक पातळीवरील बहुराष्ट्रीय कंपन्याही अशाच पिळवणूकीचे आणि एकाधिकारशाहीचे प्रतीक असल्याच्या अहवालात आरोप करण्यात आलेला आहे. भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली आणि या कंपनीने स्वतःचे नियम भारतावर लादले आणि स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने व्यापार केला. त्याचे पर्यावरण नंतर ब्रिटिशांच्या भारतावरील साम्राज्यात झाले होते.
1750 मध्ये भारत इतका समृद्ध होता की, जागतिक औद्योगिक उत्पादनाच्या 25% औद्योगिक उत्पादन भारतात होत होते. मात्र 1900 मध्ये हे प्रमाण केवळ दोन टक्क्यांवर आले. ब्रिटन भारतीय वस्तूवर जास्त आयात शुल्क लावत होता. त्यामुळे भारताच्या वस्तूंना कमी किंमत मिळत होते.