पोलिसांकडून सुमारे 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी – गहुंजे पुणे येथील मैदानावर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या 33 जणांना पोलिसांनी अटक केली. देहूरोड जवळ शुक्रवारी (26) रात्री ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड जवळील मामुर्डीगाव घोराडेश्वर डोंगर आणि विमान नगर पुणे या ठिकाणी वाकड पोलिसांनी छापा घालून 33 सट्टेबाजांना अटक केली. यावेळी पोलिसांनी 74 मोबाईल, तीन लॅपटॉप आणि एक लाख 26 हजार 430 रोख रक्कम आणि 28 हजारांचे परकीय चलन असा एकूण 44 लाख 87 हजार 730 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
अटक केलेले सट्टेबाज भारत आणि इंग्लंड दरम्यान गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या सामन्याचे घोराडेश्वर डोंगरावरून दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून सामन्याची बॉल टू बॉल माहितीच्या आधारे काही लोक सट्टा घेत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून मध्यप्रदेश (४), हरियाणा (१३) महाराष्ट्र (11) राजस्थान (३) गोवा (१) आणि उत्तर प्रदेश (१) असे एकूण 33 जणांना अटक केली. हे आरोपी भोपाळमधील बुक्की भोलू नागपूर येथील बुक्की चेतन उर्फ सोनू यांच्या संपर्कात राहून त्यांना या सामन्याची माहिती देत होते. ऑनलाइन प्रक्षेपण आणि दुर्बिणीद्वारे सांगितलेले माहिती यामध्ये काही सेकंदाचा अंतर होते. त्याचाच गैरफायदा हे आरोपी घेत होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव उपनिरीक्षक दीपक कादबाने, हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान कदम, वाकड पोलिस ठाण्याचे कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले विजय गंभीरे, विक्रम कुदळ अतिश जाधव, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, हेमंत डांगे, सागर सूर्यवंशी, श्याम बाबा, रवींद्र पवार, आकाश पांढरे, जनकसिंग गुमलड्डू अमर राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.