मिनी एसी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत
मुंबई : मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असणारी बेस्ट बस करोना विरोधातील लढ्यात आधीच उतरली आहे. त्यात आता बेस्ट उपक्रमाकडून रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील मिनी वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची लाईफ लाईन बेस्ट बस आता रुग्ण सेवेसाठीही धावणार आहे.
मुंबईत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या करोनाबाधित रुग्णांमुळे पालिकेच्या रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. करोना पॉझिटिव्ह आणि संशयीत रुग्णांना वेळीच रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. परंतु करोना रुग्ण वाढत असून रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या मिनि वातानुकूलित बसेसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमाकडून सध्या 7 मिनी वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आह. बेस्ट एकूण 20 मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करणार आहे, असे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.
धारावीसाठी बीएमसीचा ऍक्शन प्लॅन
मुंबईतील करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारवीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने, धारावीतील 350 खासगी दवाखाने सोमवारपासून (27 एप्रिल) सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दवाखान्यांमध्ये नॉन कोविड उपचारांसोबतच, करोना संशयितांचीही प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे. धारावीतील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत धारावीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला इंडियन मेडिकल कौन्सिल आणि माहीम-धारावी मेडिकल प्रॅक्टीश्नर असोसिएशन यांच्या पदाधिकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.