‘यूजीसी’ची मंजुरी : देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना फायदा
– व्यंकटेश भोळा
पुणे – आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. या दोन्हीही पदवी वैध असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने कोट्यवधी विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयस्तरावर क्रेडिट सिस्टिम लागू करण्यात आली. त्याद्वारे अन्य विद्याशाखेचा एखादा विषय घेता येण्याची मुभा आहे. मात्र, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेता येत नव्हता. एका वेळी एकाच विद्याशाखाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट होती. मात्र, सध्या शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्याने कुठलाही शाखेचा विद्यार्थी कुठल्याही शाखेतून पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रवाह वाढला आहे.
त्यानंतर आता एकाच वेळी वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गेल्या वर्षी एकाच वेळी दोन पदवी घेण्याचा विषय प्रस्ताव मांडला होता. त्यास यूजीसीने मान्यता दिली आहे. यापूर्वीही 2012 मध्ये अशी समिती स्थापन केली गेली होती. पण त्यावेळी या योजनेस मंजुरी मिळाली नव्हती.
एक नियमित, तर एक दूरशिक्षण
एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकत असाल, तर त्यापैकी फक्त एकच पदवी नियमित स्वरूपात असेल. दुसरा अभ्यासक्रम ऑनलाइन डिस्टन्स लर्निंग मोड (ओडीएल – ऑनलाइन डिस्टन्स लर्निंग) वर करावा लागेल. या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती लवकरच अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केली जाणार असल्याचे “यूजीसी’कडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी देण्याचा विषय बऱ्याच दिवसांपासून विचाराधीन होता. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना विविध विषयातील ज्ञान आवश्यक असते. यापूर्वी एकाच वेळी एकच पदवी घेता येऊ शकत होती. आता आवडीच्या विद्याशाखेवरून विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेणे शक्य आहे.
– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी.