गुंतवणुकीत रंग भरण्यासाठी बर्जर पेन्ट्स…

कंपनी ओळख

जगभर रंगांसाठीची ओळख म्हणजे बर्जर पेन्टस्‌. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर लुई बर्जर पेन्टस्‌. या नावाचा उदय सुमारे अडीच शतकांपूर्वी 1760 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. लुई बर्जर नावाचा तरुण रसायनतज्ज्ञ त्याची गुप्त प्रक्रिया वापरून पर्शियन ब्ल्य्‌ू हा रंग तयार करू लागला होता. त्याचे रंग प्रत्येक डिझायनर आणि घर रंगवू इच्छिणाऱ्याच्या पसंतीला उतरले होते.

त्याकाळी लष्करी गणवेशासाठी बहुतेकवेळा पर्शियन ब्लू रंग वापरला जायचा. बर्जरने त्याची रंग बनवण्याची पद्धत आणखी परिपूर्णतेच्या दिशेने नेली. लुई बर्जर यांची ही कल्पकता आज आणखी वृद्धिंगत करत रंगांच्या दुनियेत बर्जर पेन्टस्‌ ही आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे.

भारतात ही कंपनी अनेक वळणे घेत नावारूपास आलेली आहे. डिसेंबर 1923 मध्ये हॅडफिल्ड या ब्रिटिश व्यक्‍तीने कोलकात्यात रंगाचा एक छोटासा कारखाना सुरू केला. हॅडफिल्ड्‌स इंडिया लिमिटेड नावाने तो ओळखला जात असे. हावड्याजवळ दोन एकरात त्याचा कारखाना होता. त्याठिकाणी वॉर्निशेस आणि डिस्टेम्पर पेन्टस्‌ बनवले जायचे.

1947 मध्ये ब्रिटिश पेन्टस्‌ (होल्डिंग्ज) लिमिटेड यां आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कंपनीने हॅडफिल्डसचा कारखाना आणि कंपनी विकत घेतली आणि त्याचे नामकरण ब्रिटिश पेन्टस्‌ इंडिया लिमिटेड असे केले. या कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून अलेक्‍झांडर वेर्नोन निब्लेट हे काम पाहू लागले. त्यानंतर 1962 मध्ये अलेक्‍झांडर गोल्डविन व्यवस्थापकीय संचालक बनले. 1965 मध्ये ब्रिटिश पेन्टस्‌ लिमिटेड या कंपनीचे भागभांडवल अमेरिकेतील क्‍लिन्झी कॉर्पोरेशन या कंपनीने घेतले आणि या कंपनीची उपकंपनी असलेल्या नेदरलॅंडमधील सेलीयुरो एनव्ही या कंपनीकडे ब्रिटिश पेन्ट्‌सचे नियंत्रण गेले.

1969 मध्ये क्‍लिन्झी कॉर्पोरेशनने त्यांची भारतातील हिस्सेदारी बर्जर, जेन्सन अँड निकोल्सनला विकली. तिथून मग ब्रिटिश पेन्टस्‌ (इंडिया) लिमिटेड ही जगभरातील बर्जर समूहाशी जोडली गेली आणि लुई बर्जर यांचा वारसा भारतात सुरू झाला. 1983 मध्ये या कंपनीचे नाव बदलून ते बर्जर पेन्टस्‌ इंडिया लिमिटेड असे करण्यात आले. सध्या या कंपनीची मालकी दिल्लीतील धिंग्रा बंधू यांच्याकडे आहे.

आज या कंपनीची वार्षिक (31 मार्च 2019) उलाढाल 6,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 1969 मध्ये क्‍लिन्सी कॉर्पोरेशनने भारतातील ही कंपनी बर्जर आणि ब्रिटनमधील जेन्सन अँड निकोल्सन कंपनीला विकली. तेव्हापासून ही कंपनी जगभरातील बर्जर समूहाचा भाग बनली. तेव्हापासून लुई बर्जर यांच्या पेन्ट क्षेत्रातील समृद्ध वारशाची भारतात सुरुवात झाली. 1973 मध्ये कंपनीने इंडस्ट्रियल, मरिन आणि डेकोरेटिव्ह पेन्टच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि नव्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यावेळी कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते मधुकर डोंगरगावकर.

1976 मध्ये कंपनीच्या प्रवासात आणखी एक वळण आले. कंपनीची परकीय मालकी 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाली. कंपनीने समभागांचा मोठा हिस्सा यूबी समूहाचे सर्वेसर्वा विठ्ठल मल्ल्या (विजय मल्ल्या यांचे वडील) यांना विकला. बर्जर समूहात गेली असली तरी 1983 पर्यंत या कंपनीचे नाव ब्रिटिश पेन्टस्‌ (इंडिया) लिमिटेड असेच होते. 1983 मध्ये ते बदलून बर्जर पेन्टस्‌ इंडिया लिमिटेड असे करण्यात आले.
80 आणि 90 च्या दशकात कंपनीने अनेक नवीन उत्पादने बाजारात आणली. कलर बॅंक संकल्पना सुरू केली. ज्याद्वारे लोकांना 5000 रंगच्छटांमधून रंग निवडण्याची सुविधा उपलब्ध झाली.

1991 मध्ये यूबी समूहाकडील हिस्सा दिल्लीतील के. एस. धिंग्रा आणि जी. एस. धिंग्रा या बंधूंनी आणि यूके पेन्टस्‌ समूहातील त्यांच्या सहकाऱ्यांनी विकत घेतला. सध्या धिंग्रा बंधूंकडे कंपनीचे सुमारे 73 टक्‍के शेअर आहेत आणि कंपनीत पूर्णपणे व्यावसायिक व्यवस्थापन आले. सध्या अभिजित रॉय हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात असून भारतभर महत्त्वाच्या 16 ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. त्याखेरीज नेपाळमध्ये दोन, पोलंड आणि रशियामध्ये प्रत्येकी एक प्रकल्प आहे. कंपनीचे देशभरात 25 हजारांहून अधिक डिलर आहेत. रंगांबरोबर इतरही आवश्‍यक उत्पादनांमध्ये कंपनी आघाडीवर आहे.

इंटिरियर वॉल कोटिंग्जमध्येच कंपनीची 18 उत्पादने आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिल्क ग्लॅमर, सिल्क लक्‍झरी इमल्शन, इझी क्‍लीन, रंगोली टोटल केअर, सिल्क इल्युजन्स डिझाईन मेटालिक, सिल्क इल्युजन मार्बल फिनिश, व्हिन्टेज फिनिश, बायसन अक्रिलिक इमल्शन, बायसन ग्लो अक्रिलिक इंटरियस इमल्शन, बायसन डिस्टेम्पर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

एक्‍सटिरिअर वॉल कोटिंगसाठी वेदर कोट लॉंगलाईफ, वेदर कोट ऑल गार्ड, अँटीडस्ट, वॉसमस्ता ग्लो यांचा समावेश होतो. मेटल फिनिशेस, वुड फिनिशेस, ग्लास फिनिशेस यामध्ये लक्‍झल एक्‍स्ट्रा सुपर ग्लॉस इनॅमल, लक्‍झॉल सेव्हन इन वन, सॅटीन इनॅमल आदी लोकप्रिय आहेत. वुड फिनिशेसमध्ये इम्पेरिया लक्‍झरी पॉलीयुरेथिन, वुडकीपर इझी क्‍लीन, वुडकीपर मेलामाईन, ग्लास फिनिशमध्ये इम्पिरिया गोल्ड ग्लास कोटिंग्ज अशी विस्तृत उत्पादनांची श्रेणी कंपनीकडे आहे. वुडकोटस्‌, वॉटरप्रुफिंग सोल्युशन्स, डू इट युवरसेल्प पेटिंग किट अशी कल्पक उत्पादनेही कंपनीने बाजारात आणली आहेत.

सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 13.31 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन तो 220.94 कोटींवर पोहोचला. सप्टेंबर 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीत हा आकडा 194.98 कोटी रुपये एवढा होता. सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीतही 9.01 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन ती 1742.55 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

करोनानंतरच्या काळात डेकोरेटिव्ह पेन्टसच्या वर्गातील मागणी पूर्वपदावर आलेली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली आहे, कच्च्या मालाची रास्त किमतीत उपलब्धता यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी, वाहन क्षेत्रासाठी लागणाऱ्या रंगाची मागणी पूर्वपदावर आली आहे. प्रवासी वाहने, दुचाकी आणि ट्रॅक्‍टरच्या विक्रीतही वाढ होत असल्याने रंग उत्पादन कंपनीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाजू आहे. असा हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर दीर्घकाळात तुमचा पोर्टफोलिओ “रंगतदार’ बनू शकतो.

शुक्रवारचा बंद भाव – रु. 710.05 (एनएसई)

– सुहास यादव  (suhaspyadav@gmail.com)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.