मेघश्री दळवी
गेल्या महिन्यात अवकाश संशोधनातल्या दोन गोष्टी सतत कानी पडत आहेत- ओसिरिस-रेक्स आणि बेनू. यातलं ओसिरीस-रेक्स आहे नासाचं छोटं यान, आणि त्याने यशस्वीपणे ज्या अशनीचा नमुना मिळवला आहे, ती अशनी आहे बेनू.
डिसेंबर 2018 मध्ये ओसिरिस-रेक्स बेनूच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं. त्याच्या पहिल्याच निरीक्षणात बेनूवर पाण्याचा अंश असण्याची शक्यता समोर आली. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2020 रोजी ओसिरिस-रेक्स प्रत्यक्ष बेनूवर उतरलं, आणि त्याने बेनूचा एक तुकडा सॅम्पल म्हणून उचलला. यात विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेनूचा आकार केवळ अर्धा किमी लांबी-रुंदीचा, त्यातून तो वेगाने स्वत:भोवती गिरक्या घेत असल्याने त्याच्यावर यान उतरवणं हे एक आव्हान होतं. बरं ही चीज आहे आपल्यापासून तीन लाख किमीपेक्षाही जास्त अंतरावर. तरीही आपण पृथ्वीवरून ओसिरिस-रेक्सला अगदी अचूक नियंत्रण करत या चिमुकल्या अशनीवर उतरवलं आणि त्यात ड्रिल करून सॅम्पल मिळवलं. आता हा खजिना घेऊन परत येणाऱ्या ओसिरिस-रेक्ससाठी शास्त्रज्ञ आतुर झाले नसते तर नवल!
गेल्या काही वर्षांमध्ये अशनींच्या अभ्यासाला बरंच महत्त्व आलेलं आहे. एकतर अवकाशात भरपूर प्रमाणात लहानमोठ्या अशनी फिरत असतात. त्या बहुतांशी खडकरूपात असल्याने त्यांचं निरीक्षण सहज करता येतं, प्रसंगी त्यांच्यावर उतरताही येतं. अशनींमध्ये खाणकाम करून मौल्यवान धातू मिळवता येतील याची शास्त्रज्ञांना खात्री आहे, पण त्याहूनही त्यांना जास्त रस आहे तो अशनींच्या नमुन्यांचं पृथक्करण करून त्यावरून विश्वाच्या जडणघडणीचा अंदाज करण्यात.
या बाबतीत बेनूने आता आपल्यापुढे खूपच आशादायक चित्र उभं केलं आहे. बेनूच्या पृष्ठभागावर सेंद्रिय म्हणजे कार्बन-आधारित रेणू मुबलक प्रमाणात आढळले आहेत. याचाच अर्थ विश्वात असे कार्बन संयुगांचे रेणू अनेक जागी मिळू शकतात, आणि केवळ आपण नव्हे तर इतरत्रही कार्बनवर आधारित सजीवसृष्टी असू शकते. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती असेल त्याप्रमाणे हे सजीव सूक्ष्म किंवा मोठ्या आकाराचे असू शकतात. तिथल्या गरजेनुसार उत्क्रांत होऊ शकतात. आपली अन्नसाखळी बनवून राहू शकतात.
आपली पृथ्वी आणि तिथली जैवविविधता हे सजीवांचं एक रूप झालं, पण अशी अनेक रूपं या अफाट अंतराळात असू शकतात ही कल्पना अतिशय मोहक आहे. बेनूकडून मिळालेल्या डेटामुळे या विचारांना मजबूत पुष्टी मिळत आहे.
बेनूच्या पृष्ठभागावर दोन प्रकारचे खडक आढळले आहेत. त्यांच्या घनतेत आणि रचनेत फरक आहे. उत्तर आणि दक्षिण भागाच्या भूरचना बऱ्याच वेगळ्या आहेत. या सगळ्यावरून बेनूच्या आणि एकूणच अशनींच्या निर्मितीवर काही प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे. ओसिरिस-रेक्सने आणलेलं बेनूचं सॅम्पल आपल्यापर्यंत पोहोचायला 2023 चा सप्टेंबर उजाडणार आहे. त्यावेळी ही इवलीशी अशनी विश्वाची आणखी कोणकोणती भव्य रहस्यं उलगडते हे पाहूया!