दिवाळी संपली असली, तरी फटाक्यांचा ‘भाव’ कमी झालेला नाही. खरी दिवाळी 23 नोव्हेंबरला असल्यामुळे अनेकांनी फटाके आणि ते उडवण्याची हौस राखून ठेवली आहे. अर्थात, ती पूर्ण होईल की नाही याबद्दल शंकाही बर्याच आहेत. कारण यंदा मित्राचा मित्र, शत्रूचा मित्र, मित्राचा शत्रू, शत्रूचा शत्रू, मैत्रीपूर्ण लढती, सांगली पॅटर्न अशी रंगीबेरंगी समीकरणं पुष्कळ आहेत. शिवाय, 23 तारखेनंतरचं गणित वेगळंच असेल, असंही ऐकायला मिळू लागलंय.
म्हणजे, मतदारांनी पुरतं कन्फ्यूज होऊन गणित हा विषयच ऑप्शनला टाकावा, अशी परिस्थिती. फटाके वाजवावेत तरी पंचाईत, न वाजवावेत तरी पंचाईत. असो, या फटाक्यांचं काय करायचं हा प्रश्न पडण्यापूर्वी या फटाक्यांचं काय करायचं नाही, हे समजून घेऊया. तेसुद्धा ‘मैत्री’च्या उदाहरणातून! कदाचित मैत्रीचाही अर्थ उलगडेल.
घटना आहे कर्नाटकातली. फटाक्यांमध्ये जे स्फोटक भरलेलं असतं त्याला ‘दारू’ म्हणत असले, तरी फटाके वाजवताना माणसाच्या शरीरात दारू असता कामा नये, असाही धडा या घटनेतून मिळतो. कारण दारू पिऊन फटाक्यातल्या दारूशी खेळ करणार्या सात मित्रांपैकी एक आता हयात नाही आणि उरलेले सहाजण पोलीस कोठडीत पोहोचलेत. त्यांचा मैत्रीचा ‘पॅटर्न’ जीवघेणा ठरलाय आणि पोटातली दारू निष्क्रिय झाल्यावरच या मित्रांना फटाक्यातल्या दारूच्या ताकदीचा अंदाज आलाय. पण ‘बैल गेला आणि झोपा केला’, अशी एकंदर अवस्था!
मैत्रीत पैजा लावणं, खोड्या करणं (आजच्या भाषेत ‘प्रँक’) अगदीच कॉमन असतं. पण नशेत लावलेली पैज जिवावर बेतली. या सात मित्रांपैकी एकाला व्यवसायासाठी रिक्षा घ्यायची होती. इतर मित्रांना हे ठाऊक होतं. ऐन दिवाळीत नशापान केल्यावर हे मित्र फटाके उडवू लागले. नशेमुळं भीड चेपलेली. पराक्रम गाजवण्याची हुक्की आलेली. मग त्यांची पैज लागली. फटाक्यांच्या डब्यावर बसून दाखवायचं! रिक्षा घेण्याचं स्वप्न असलेला मित्र यासाठी तयार झाला. मित्रांनी त्याला सांगितलं, या डब्यावर बसून दाखवलंस तर तुला आम्ही रिक्षा घेऊन देतो. मग त्याचं धाडस आणखी वाढलं.
सगळ्यांनी मिळून त्याला फटाक्यांच्या डब्यावर बसवलं आणि वात पेटवून सगळे पांगले. काही क्षण शांततेत गेले आणि प्रचंड स्फोट झाला. धुराचे लोट उठले. फटाक्यांच्या डब्यावर बसलेला मित्र कोसळला होता. दोन-तीन सेकंदांसाठी तो उठला. जोरात कळवळला आणि पुन्हा कोसळला, तो कायमचाच! दूर पळालेले मित्र त्याच्याभोवती गोळा झाले. आपला मित्र संपल्याचं समजल्यावर त्यांची ‘उतरली’ आणि तिथेच थांबावं की पळून जावं, अशी द्विधावस्था झाली. एका सीसीटीव्ही कॅमेर्यानं हे सगळं पाहिलं.
या सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे हल्ली अशा बर्याच गोष्टी समोर येतात, ज्या एरवी लपून गेल्या असत्या. वरील घटनेतही नेमकं जे घडलं ते लपलं असतं आणि ‘अपघात’ म्हणून फाईल क्लोज झाली असती. पोलिसांनी तातडीनं हालचाली करून सहा मित्रांना ताब्यात घेतलं. फटाक्यांमुळे होणारे अपघात, प्रदूषण आदी सर्व बाबी आपल्याला ठाऊक आहेत. त्यामुळे होणार्या नुकसानीची तीव्रताही माहीत आहे. तरीसुद्धा धोका पत्करून जिवाशी खेळ सुरूच असतात. मनाला रिझवण्याचे मार्ग अधिकाधिक अघोरीपणाकडे झुकत चाललेत. मानसिकतेचा हा प्रवास आत्यंतिक चिंताजनक!