कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने येथे पूर्ण ताकद पणाला लावली असून सत्ताधारी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी भाजपला कडवा प्रतिकार करताना दिसत आहेत. अशातच आज ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधताना ‘बंगालचे गुजरात होऊ देणार नाही’ अशी गर्जना केली आहे.
कोलकाता शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संगीत मेला २०२० या कार्यक्रमाला ममता यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, “आपणाला आपल्या मातृभूमीच्या सन्मान आणि रक्षा करायची आहे. कोणीही बंगालचा विध्वंस करू शकत नाही. आम्ही बंगालचे गुजरातीकरण होऊ देणार नाही.”
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे भाजपने जोरदार ताकद लावली असून तृणमूलमधील काही नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. तृणमूलच्या गोटातील आमदार भाजपमध्ये आल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी, “निवडणुका येईपर्यंत ममता दीदी पक्ष एकट्याच उरतील’ असं वक्तव्य केलं होत.