बंगाल हिंसाचार : पंतप्रधान मोदींनी राज्यपाल धनखड यांना फोन करत व्यक्त केली चिंता; म्हणाले…

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून येथे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना सत्तेच्या चाव्या राखण्यात यश आलं आहे. मात्र निकालांनंतर राज्यात जाळपोळ व हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. आपल्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. अशातच आज राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी हिंसाचाराच्या घटनांबाबत आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे संपर्क साधल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्याचं देखील राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल धनखड यांनी याबाबत एक ट्विट केले असून यात त्यांनी ममता बॅनर्जी यांना मेंशन केलं आहे. ते लिहतात, “पंतप्रधानांनी संपर्क साधून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात घडत असलेल्या जाळपोळ, हिंसाचार, व लुटमारीच्या घटनांबाबत पंतप्रधान कार्यालयाने व्यक्त केलेली चिंता मांडत आहे. संबंधितांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न करावेत.”

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी काल (सोमवारी) राज्याला संबोधित करताना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. यासोबतच त्यांनी हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरत, “बंगाल एक शांतीप्रिय राज्य आहे. निवडणुकांदरम्यान तणाव निर्माण झाला होता. भाजप व सीएपीएफने मोठ्या प्रमाणात अत्याचार केला. मात्र मी जनतेला विनंती करते की, त्यांनी शांतता राखावी. काही वाद असतील तर पोलिसांमध्ये तक्रार द्यावी जेणेकरून पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल.” असे आवाहन केले.

दरम्यान, पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांनंतर येथे हिंसेच्या अनेक घटना घडल्या. भाजप नेते गौरव भाटिया यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, ‘बंगालमध्ये महिलांसोबत बलात्काराच्या घटना घडत आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्यात आलंय. यामुळे बंगाल हिंसाचाराची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी.’ अशी मागणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.