कोलकता – पश्चिम बंगालला लवकरच नवे राज्यपाल मिळतील. ते माजी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासारखेच असतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केला.
उपराष्ट्रपती बनण्याआधी धनखड यांच्याकडे बंगालच्या राज्यपाल पदाची सुत्रे होती. राज्यपाल असताना त्यांचा अनेकदा तृणमूल कॉंग्रेस सरकारशी संघर्ष झाला. धनखड यांच्या नंतर मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांच्याकडे जुलैमध्ये बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. गणेशन यांचा अद्याप तरी बंगाल सरकारशी कुठलाही संघर्ष झालेला नाही. उलट, त्यांचे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी सौहार्दाचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी तामीळनाडूत गणेशन यांच्या परिवाराशी संबंधित एक सोहळा झाला. त्या सोहळ्याला ममता उपस्थित राहिल्या होत्या. ती घडामोड ताजी असतानाच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नव्या राज्यपालांविषयीचे वक्तव्य केले.
Gujarat Assembly Election 2022 : शशी थरूर यांचा गुजरातमध्ये प्रचारास नकार, समोर आलं ‘हे’ कारण….
धनखड यांच्या पाऊलांवर नवे राज्यपाल पाऊले टाकतील, असेही त्यांनी म्हटले. त्यावरून तृणमूलने भाजपवर पलटवार केला. राज्यपालांच्या कार्यालयांचे रूपांतर भाजपने स्वत:च्या प्रदेश मुख्यालयांत केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यातून ते सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया तृणमूलकडून देण्यात आली.